पुणे – निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरू केलेली आहे. पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे २८ हजार तर समान छायाचित्राचे १ लाख ४२ हजार ३४९ मतदार असल्याचे आढळून आले आहे. या सर्व 1 लाख 72 हजार मतदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
त्यांना ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे अभिप्रेत आहे, तो निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे, यासाठी दि.1 जानेवारी 2024 ही अंतिम मुदत आहे. दरम्यान, या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्र्शासनाने दिला आहे.
भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असलेचे आढळुन आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एका पेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.
या नोटीसद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबंधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतिसह अपलोड करावे. अथवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हा निवडणुक शाखेकडून देण्यात आल्या आहेत. या मुदतीमध्ये 1 लाख 72 मतदारांना आपले नाव एकाच मतदारसंघात ठेवावे लागणार आहे.