पुणे – गणेशोत्सवात आपल्याच भागात गणेश मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेले फिरते हौद तसेच गर्दीच्या ठिकाणी ठेवलेली मोबाइल टॉयलेट पुणेकरांना सोयी ऐवजी गैरसोयीची ठरत आहेत. फिरत्या हौदांबाबत जनजागृतीच केली गेलेली नाही.
तसेच, फिरत्या हौदाच्या मार्गाचे नियोजनही जाहीर केलेले नाही तर, शहराच्या वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आलेल्या मोबाइल टॉयलेटला पाण्याची सुविधा नसल्याने तसेच त्याचा वापर झाल्यानंतर ते अस्वच्छच ठेवले जात असल्याने त्याचा वापरच नागरिकांना करता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, महापालिकेच्या या दोन्ही सुविधांबाबत साशंकता उपलब्ध केली जात आहे.
पाणी, बकेट, स्वच्छता यासह सर्व सुविधा ठेकेदाराकडून तपासणे आवश्यक आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात हे स्वच्छतागृहाची तपासणी करू, जर आवश्यक गोष्टी नसतील त्यावर कारवाई केली जाईल. – संदीप कदम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग
फिरते हौदच गायब…
प्रशासनाने बांधलेले हौद, लोखंडी टाक्या, मूर्ती दान केंद्र उभारले अशी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. मंडळे तसेच नागरिक मागणी करीत असल्याचे सांगत प्रशासनाने 150 फिरते हौद उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, ते कोणत्या रस्त्यावर कधी असतील त्यांचा मार्ग काय असेल याची कोणतेही नियोजन पालिकेने जाहीर केलेले नाही.
या हौदांच्या गाड्यांवर कुठेही ध्वनीक्षेपकही नाहीत. त्यामुळे हे हौद गायबच असून त्याचे जीपीएस मॅपिंग केले जाते की नाही, याबाबतही पालिकेकडे माहिती नाही. तर, अनेक गाड्या फिरण्याऐवजी गेल्या काही दिवसांपासून एकाच जागेवर थांबून असल्याचेही समोर आले आहे.
मोबाइल टॉयलेट अस्वच्छ…
गणेशोत्सवाच्या कालावधीत तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने शहरात 380 मोबाइल टॉयलेट उभारली. मात्र, त्यात पाणीच नाही. याबाबत आरडा-ओरडा झाल्यानंतर अशा स्वच्छतागृहाच्या बाहेर पाण्याचे ड्रम ठेवण्यात आले.
परंतु, पाणी घेऊन जाण्यासाठी बादल्या अथवा मग ठेवण्यात आले नाहीत, त्या पेक्षाही “घाणेरडे’ नियोजन म्हणजे एकदा वापर केल्यानंतर त्यांची स्वच्छताही करण्यात आलेली नाही. एका स्वच्छतागृहासाही महापालिका दिवसाला 1100 रुपये शुल्क मोजणार असतानाही ती अस्वच्छ असल्याने नागारिकांना त्यांचा काहीच फायदा झालेला नाही.