पुणे – डबल ड्युटीमुळे चालकांना पुरेसा आराम मिळत नाही. भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. मागील आठवड्यात याच कारणामुळे दोन पीएमपी बसचा समोरासमोर अपघात झाला. त्यामुळे पीएमपी चालक आणि वाहक यांच्यासह बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता डबल ड्युटी देण्यात येणार नाही. ही माहिती पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
पीएमपीच्या ताफ्यात 1,200 बस ठेकेदारांच्या आहेत. तर 900 पेक्षा अधिक बस पीएमपीच्या स्व:मालकीच्या आहेत. ठेकेदारांच्या आणि पीएमपीच्या बसेसवर बहुतांश चालक हे बदली, हंगामी रोजंदारी आहेत. त्यांना काम मिळाले तरच पगार मिळतो. तर अधिकचे पैसे मिळावे, याकरिता काही चालक ओव्हरटाइम करतात. त्यांना महिन्याचा ठराविक पगार नाही. घरसंसार सुरळीत चालावा, यासाठी हे चालक कशाचीही पर्वा न करता डबल ड्युटी करतात.
परिणामी, अपघाताच्या घटना घडतात. मागील आठवड्यात झालेला बीआरटीचा अपघातदेखील यामुळेच झाला होता. यापार्श्वभूमीवर चालक पीएमपीचा असो वा ठेकेदाराचा, कोणालाही यापुढे डबल ड्युटी देण्यात येणार नसल्याचे सिंह यांनी सांगितले. तर संबंधित चालकांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात यावा, अशा सूचना ठेकेदार यांना दिल्या आहेत.
दुसऱ्या सत्रातही बसची संख्या वाढवावी…
दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या सत्रापेक्षा कमी बस सोडल्या जातात. त्यामुळे काही मार्गावर प्रवाशांना जास्तवेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांना तत्काळ बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी दुसऱ्या सत्रातही बसची संख्या पहिल्या सत्राप्रमाणेच असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
एकवेळी बस उशिरा गेली, रद्द झाली तरी चालेल. मात्र, डबल ड्युटी देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही चालकांना येथून पुढे ओव्हर ड्युटी न देण्याचे आदेश दिले आहेत. – सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष, पीएमपी