पुणे – शहराचे विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, माजी स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते आणि सोबतीला डझनभर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असतानाही कसबा विधानसभा मतदार संघात महापालिकेकडून विकासकामे होत नसल्याचे सांगत चक्क भारतीय जनता पक्षाने महापालिका प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक सिमेंट रस्ते, ड्रेनेज लाईन बदलणे, पथदिवे, तसेच पदपथ करण्यासाठी कोट्यवधीची कामे झाली आहेत. असे असतानाही, आता या कामासाठी केलेल्या खोदाई मुळे रस्त्यावर खड्डे पडले असून आता त्यासाठी भाजपकडून आंदोलन केले जात असल्याने भाजपचे आंदोलनावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तर हीच कामे सुरू असताना त्याचे श्रेय घेण्याचे फलक भाजप नगरसेवकांनी लावलेले असताना आता मात्र या आंदोलनात भाजपकडून रस्त्यावरील खड्ड्यांचे खापर महापालिका प्रशासनावर या आंदोलनात फोडण्यात आले. मात्र, या आंदोलनामुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कसबा मतदारसंघातील आपल्या प्रभागात खर्च केलेला निधी कुठे गेला असा प्रश्न विचारण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.
आयुक्तांकडे तक्रार का नाही ?
एका बाजूला विकास कामे होत नसल्याची ओरड माजी सत्ताधारी भाजपच करत असताना, दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी नगरसेवक मात्र प्रभागात सुस्त आहेत. प्रशासकाच्या कालावधीत विकासकामे होण्यासाठी नगरसेवकांनी डबा घेऊन पालिकेत यावे नागरिकाच्या समस्या सोडवाव्यात, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी पदाधिकारी तसेच नगरसेवकांना दिल्या होत्या. मात्र, भाजपचे काही नगरसेवक फक्त ठेकेदाराची बिले काढून देण्यासाठीच पालिकेत येत असल्याचे वास्तव आहे.