पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या स्थापनेपासून शहरात पाणी पुरवठा, ड्रेणेज, वीज वाहिन्या, खासगी कंपन्यांसह अनेक सेवा वाहिन्या जमीनीखाली टाकण्यात आल्या आहेत, मात्र, या सेवा वाहिन्यांचे मॅपिंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे, आता शहरात नवीन विकासकामांसाठी उड्डाणपूल, मेट्रो तसेच नवीन कामांच्या खोदाईत या सेवा वाहिन्या अडथळा ठरतात. तसेच, या सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च तसेच वेळेचा अपव्यय होतो.
ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडून शहरातील भूमिगत सेवा वाहिन्यांचे मॅपिंग केले जाणार आहे. त्यासाठी अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रायोगिक तत्वावर बाणेर, बालेवाडी भागात हे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील महिन्यांत ते पूर्ण होईल, त्यानंतर या कामाची उपयुक्तता लक्षात घेऊन संपूर्ण शहरासाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
या सेवा वाहिन्यांचे होणार मॅपिंग
– जलवाहिनी
– सांडपाणी वाहिनी
– महावितरणची केबल
– गॅस वाहिनी
– खासगी कंपन्यांच्या केबल
वेळ आणि कोट्यवधींचा खर्च…
महापालिकेकडून रस्तेकाम, समाना पाणी योजना यासह मेट्रो, नवीन उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग या कामांसाठी खोदाई करताच जमीनीखाली सेवा वाहिन्यांचे जाळेच समोर येते, अशा वाहिन्या स्थलांतरीतसाठी मोठा खर्च करावा लागतो. या शिवाय, वाहतुकही बंद ठेवावी लागते. परिणामी, वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे, या सेवा वाहिन्यांची माहिती आधीच असल्यास या अडचणी कमी होणार आहेत.
त्यासाठी केल्या जाणार्या या सर्वेक्षणात अल्ट्रासाऊंडचा वापर केला जाणार आहे, त्यामुळे जमीनीखाली किती खोल, किती आकाराची तसेच कोणती वाहिनी नेमकी कुठे असून त्याचे जोडचे नकाशे तयार केले जाणार आहेत. परिणामी, भविष्यात कोणतीही नवीन कामे करताना अथवा त्याचा आराखडा करताना या नकाशांचा मोठा फायदा होणार आहे.