* बालभारती ते पौड फाटा रस्ते बांधकामासाठी निर्णय
* पुनर्वसन करण्यासाठी 200 घरांची पुन्हा नोंदणी करणार
पुणे : बालभारती ते पौड फाटा रस्त्यासाठी महापालिकेने अखेर संमिश्र रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 1,800 मीटर लांबीच्या या रस्त्याचा सुमारे 400 मीटरचा भाग उन्नत (एलिव्हेटेड) असेल. या कामासाठी सुमारे 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, पौड फाट्याकडून या रस्त्याकडे जाताना, तसेच पुढे काही अंतरापर्यंत सुमारे सव्वातीन एकरावर झोपडपट्टी आहे. येथील घरांचे “एसआरए’कडून आठवडाभरात फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. ही माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
बालभारती ते पौड फाटा रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी हे सर्वेक्षण तातडीने केले जाणार आहे. यात पात्र आणि अपात्र झोपडीधारक निश्चित करणे महत्त्वाचे असून त्यानंतर लगेच त्यांच्या पुनर्वसनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने हा रस्ता प्रस्तावित केला आहे.
मात्र, या रस्त्यामुळे “एआरआय’ टेकडीवरील पर्यावरणास धोका पोहचणार असल्याने त्यास पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे तज्ज्ञ तसेच पर्यावरण प्रेमींची भूमिका लक्षात घेत महापालिकेने सुमारे 1,800 मीटरपैकी 1,400 मीटर रस्ता जमिनीवरून करण्यात येणार आहे. तर, टेकडी परिसर आणि टेकडीवरील पर्यावरणास हानी पोहचू शकते, त्या ठिकाणी सुमारे 8 फूट उंचीवरून उन्नत रस्ता केला जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास तसेच टेकडीवरील प्राण्यांनाही अडथळा होणार नाही अशा पध्दतीने हा रस्ता केला जाणार आहे.
भुयारी मार्गही प्रस्तावित
पौड फाट्याकडून बालभारतीकडे गेल्यानंतर तिथून विधी महाविद्यालयाकडे कोणत्याही अडथळ्यांशिवाय जाण्यासाठी बालभारतीसमोरून “एनसीसी’ मैदानापर्यंतर भुयारी मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे.
…म्हणून फेरसर्वेक्षण
पौड फाटा येथून पुढे असलेल्या या सव्वातीन एकर जागेतील घरांचे यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही नवीन घरे झालेली असल्याने हे
सर्वेक्षण करून घेतले जाणार आहे.