उशिरा का होईना, चौकशी अहवाल अखेर पालिका आयुक्तांना सादर
पुणे – वारजे येथील पालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यात करोना रॅपिड अँटीजेन टेस्ट किटमध्ये गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली होती. या प्रकारावरून पोलिसांनी महापालिकेस पत्र पाठवत अधिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने अखेर साडेतीन महिन्यानंतर आपला अहवाल महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सोमवारी सादर केला आहे.
आरोग्य विभागाचे कर्मचारी-अधिकारी यांचे जबाब, किट वापरचा हिशेब, पोर्टलवरची माहिती याचा या अहवालात समावेश आहे. शिवाय, किट वापरात अनियमितता असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकारत तथ्य आढळल्यास महापालिका आयुक्त काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वारजे येथील बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर 2021 या काळात रॅपिड अँटिजेन टेस्ट किट खासगी लॅबला विकल्याचा आरोप महापालिकेच्या एका निलंबित डॉक्टरकडून करण्यात आला. पोलिसांकडे याची तक्रार केल्यानंतर त्यात प्राथमिक चौकशीमध्ये या तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी यामध्ये घोटाळा झाल्याचे महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करावी असे पत्र सप्टेंबर 2022 मध्ये महापालिकेला पाठवले.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाहीन देता चौकशी समिती स्थापन केली. पण, या समितीला चौकशीची मुदत देण्यात न आल्याने तीन महिने उलटले, तरीही त्याचा अहवाल सादर झाला नव्हता.
मात्र, ही बाब माध्यमांतून उघडकीस आल्यानंतर जागे झालेल्या चौकशी समितीने आयुक्तांनी आठ दिवसांची मुदत दिली असली, तरी प्रत्यक्षात 15 दिवसांची अहवाल सादर केला आहे.