पुणे – सर्वसामान्य पुणेकरांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आपल्या 19 प्रसूतीगृहांत जेनेरिक औषधे स्टोअर सुरू करणार आहे.
यासाठीची जागा प्रशासन देणार असून, त्यासाठीचे भाडेही संबंधित कंपनीकडून आकारले जाणार आहे. याबाबत मनपा आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी माहिती दिली.
महागड्या औषधांच्या तुलनेत ही औषधे जवळपास 70 ते 80 टक्के स्वस्त असतात. महापालिकेने शहरात अशा प्रकारची मेडिकल सुरू करावीत, यासाठीचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक अजय तायडे यांनी दिलेला होता.
मात्र, त्यानंतर केवळ एकाच ठिकाणी असे स्टोअर सुरू झाले होते. त्यानंतर आता शासनाने याबाबतचे आदेश काढण्यात आल्यानंतर महापालिकेने ही कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, राज्यशासनाने नॅकॉफ इंडिया या संस्थेने महापालिकेस जेनेरिक मेडिकल स्टोअर उघडण्यासाठी जागा देण्याचे आदेश काढले आहेत. त्या अनुषंगाने जागा निश्चित केली आहेत.
तसेच ही जागा भाडेकराराने दिली जाणार असल्याने महापालिकेने या जागांचे मुल्यांकन मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून करून घेतले आहेत. हा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून स्थायी समितीत ठेवण्यात येणार आहे.