पुणे -ज्या नागरिकांनी 2012 पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे, परंतु मागील 10 वर्षांमध्ये अद्ययावत (अपडेट) केलेले नाही, अशा नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे.
मागील नऊ महिन्यात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील सुमारे 80 हजार इतक्या नागरिकांनी आधार अद्ययावत केले असून अजूनही जिल्ह्यात सुमारे 29 लाख 20 हजार इतक्या नागरिकांचा आधार तपशील अद्ययावत करणे प्रलंबित आहे.
केंद्र आणि राज्य सरकारी योजना, लाभ यांसह रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मोबाइलचे सीमकार्ड घेणे किंवा अद्ययावत करणे, बॅंक खाते उघडण्यापासून सर्व ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधारची मागणी केली जाते. आधारवरील लिंग, नाव, पत्ता, छायाचित्र आदींमध्ये बदल झाल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असते.
मात्र, दर दहा वर्षांनी आधार अद्ययावत करावे लागते, ही बाब नागरिकांना अद्याप माहिती नाही. नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधारवरील तपशीलात बदल करू शकतात.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया) अपडेट डॉक्युमेंट नावाची नवी सुविधा तयार केली असून माय आधार या संकेतस्थळावर ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरही माहिती अद्ययावत करता येते.
मात्र, आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक स्वरुपाचे आहे. देशातील 40 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून त्यापैकी पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
अजूनही 29 लाख 20 हजार नागरिकांचे आधार अपडेट करणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जून महिन्यापर्यंत 60 हजार नागरिकांनी आधार अपडेट केले. तर ऑक्टोंबरपर्यंत 20 हजार नागरिकांनी आधार कार्ड अपडेट करून घेतले आहे.
याठिकाणी आधार अपडेट करता येणार
ज्या नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी आधार काढले आहे. अशांनी पत्ता, मोबाइल क्रमांक, तसेच बोटांचे ठसे बदलले असतील ते अद्ययावत करून घ्यायचे आहे. ग्रामीण अथवा शहरातील सेवा केंद्र, टपाल कार्यालय किंवा माय आधार संकेतस्थळावरही अद्ययावत करता येत आहे.
आधारसाठी ही कागदपत्रे आवश्यक
आधारसाठी ओळखीच्या पुराव्यासाठी विविध कागदपत्रे स्वीकारली जातात. त्यामध्ये मनरेगा जॉब कार्ड, निवृत्ती वेतन कार्ड, पारपत्र, जन्म तारखेसाठी-जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, गुणपत्रिका, ओळखीचा पुरावा-शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना यांचा समावेश आहे.