कराड, उंब्रजमध्ये राज्यमार्गावर ठिय्या; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
कराड/उंब्रज – गत वर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा, तसेच गळीत हंगामातील ऊसाला 3 हजार 500 रूपये दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाचवड फाटा व उंब्रज, ता. कराड येथे राज्यमार्गावर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन केले.
पाचवड फाटा, ता. कराड येथे रविवार, दि. 19 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यमार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, कराड तालुकाध्यक्ष बापुसाहेब साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, दादासाहेब यादव, प्रमोद जगदाळे, सतीश यादव उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी जोपर्यंत ऊस दराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत वाहतूक रोखून धरली जाईल, तसेच आंदोलने अशीच सुरू राहतील, अशी भूमिका घेतली.
या आंदोलनास बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश शेवाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. याप्रसंगी, कारखानदाराच्या दबावा पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि झुकणार नाही, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना स्वाभिमानी ताब्यात घेतले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
तसेच ऊस दरावरून कारखानदारांबरोबर चर्चा फिस्कटल्याने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून राज्यभरात तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे. रविवारी उंब्रजमध्ये याचे पडसाद उमटले. येथील राज्य मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरमधील हवा सोडून ऊस वाहतूक रोखली. तसेच पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर आंदोलकांनी ऊस वाहतूक रोखली. यावेळी कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सकाळी उंब्रज येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ऊस वाहतूक करणाऱ्या काही ट्रक्टरच्या चाकातील हवा सोडून उंब्रज-पाटण रोडवरील ऊस वाहतूक रोखून धरली. आंदोलकांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या मांडला.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, तालुका अध्यक्ष प्रमोद जगदाळे, वसंतराव पाटील, कॅप्टन इंद्रजित जाधव, पेर्लेकर पाटील, मानसिंग यादव, युवराज चव्हाण व आंदोलक उपस्थित होते.