dragon fruit – ड्रॅगन (dragon fruit) म्हणल्यावर लाल अथवा गुलाबी रंगच समोर येतो. मात्र, मार्केट यार्डातील फळबाजारात प्रथमच पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फळाची आवक झाली.
यंदा प्रथमच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून पिवळे ड्रॅगन दाखल झाले आहे. आंबट, खारट आणि चवीने थोडेसे गोड असलेल्या या फळाला इस्रायल ड्रॅगन फ्रूट (dragon fruit) असेही म्हटले जाते.
जत तालुक्यातील उटगी गावातील उमेश लिगाडे या शेतकऱ्याच्या शेतातून 248 किलो माल रविवारी (दि. 8) येथील बाजारात दाखल झाला आहे. आडते रावसाहेब कुंजीर यांच्या गाळ्यावर हा माल आला.
त्यास 38 हजार रूपये दर मिळाला. लिगाडे यांनी सव्वा एकर क्षेत्रात पिवळ्या ड्रॅगनची लागवड केली आहे. त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा लाल ड्रॅगनची लागवड केली होती. त्यात विविध प्रयोग त्यांनी राबवले.
तर, 2021 मध्ये पिवळ्या ड्रॅगनची दोन हजार रोपांची लागवड केली होती. त्याचे उत्पादन आता सुरू झाले आहे. लाल ड्रॅगनच्या तुलनेत पिवळ्या ड्रॅगनची टिकवण क्षमता अधिक आहे.
या फळाचा गर पांढरा असतो. महाराष्ट्रात सांगलीसह केवळ सोलापूर येथील एका शेतकऱ्याने या फळाची लागवड केली आहे.
कोट
बाजारात प्रथमच पिवळे ड्रॅगन फळ दाखल झाले आहे. लाल ड्रॅगनच्या तुलनेत हे फळ अधिक चविष्ट असल्याने त्यास मागणी चांगली असून, दरही चांगला मिळाला आहे.
– अमोल म्हस्के (आडते)