पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आजी- माजी शिक्षक आमदार व त्यांच्या समर्थकांनी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावीत, यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर रस्त्यावरच तळ ठोकला होता. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही रस्त्यावर बसवून त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात व आवारात या गर्दीमुळे बाजारच भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पुणे, अहमदनगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील शाळा, कनिष्ट महाविद्यालयातील विविध कामांची प्रकरणे दाखल होत असतात. त्यात संच मान्यता व त्यातील दुरुस्त्या, शालार्थ आयडी, नवीन व तुकडी मान्यता, दर्जावाढ, विषय मान्यता, सांकेतांक क्रमांक, वैद्यकीय उपचार प्रतिपूर्तीची बिले, अनुकंपा भरती आदींबाबतीची प्रकरणे मान्यतांसाठी होत असतात.
ही प्रकरणे वेळेत मार्गी लागत नाहीत. त्यामुळे प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यालयात शिक्षक, कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी, एजंट, आजी-माजी शिक्षक आमदार कार्यालयात सतत हेलपाटे मारत असतात. हे चित्र गेल्या काही वर्षांपासून अद्यापही कायमच आहे.
आजी-माजी शिक्षक आमदारांकडेही शिक्षक, कर्मचारी व्यथा मांडत असतात. त्याची दखल घेत गुरुवारी (दि. ७) काही आजी-माजी शिक्षक आमदारांसह शिक्षक, कर्मचारी यांना राडा केला. कार्यालयाच्या बाहेर व आवारातील रस्त्यावरच तळ ठोकला होता. या सर्वांनी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयाबाहेर बोलावून रस्त्यावर बसण्यास भाग पाडले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रकरणे प्रलंबित ठेवण्याबाबत जाबही विचारण्यात आला. त्यावर खुलासाही करण्यात आला.
त्यानंतर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्या कार्यालयात आजी- माजी शिक्षक आमदार व त्यांच्या समर्थकांनी तळ ठोकत प्रकरणे मार्गी लावून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. काही प्रकरणांच्या मंजुरीचे आदेश प्राप्त करत ते वाटप करण्याचे फोटोसेशनही करण्यात आले. नियमबाह्य्, त्रुटीची प्रकरणेही घाईघाईने निकाली काढावीत, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणल्याचे आढळुन आले. मात्र, नियमबाह्य प्रकरणे निकाली निघणार नाहीत, असे राजेंद्र अहिरे यांनी ठामपणे आजी- माजी आमदारांना सांगितले.
कामकाजाचा अधिकचा व्याप असताना व अपुरे मनुष्यबळ असताना दिवस, रात्र व सुट्टीच्या दिवशी काम करून प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. असे असताना रस्त्यावर बसवुन अपमानास्पद वागणूक मिळाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही संतापही व्यक्त करण्यात आला.