संगमनेर (प्रतिनिधी) – जमिन तारण ठेवून पतसंस्थेकडून घेतलेल्या 21 लाख 50 हजार रुपयांच्या कर्जापोटी कोणताही परतावा न केल्याने तारण मालमत्तेवर बोजा चढला. त्याचा राग मनात ठेवून चिकणीच्या बाप-बेट्याने बलराम सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक पद्माकर मतकर यांना बेदम मारहाण केली.
यावेळी पोराने पेपरवेट फेकून तर बापाने गचांडी धरून टेबलावरील काचेवर त्यांचे डोके आपटून त्यांना गंभीर जखमी केले. मदतीसाठी धावलेल्या महिला कर्मचार्यांवरही दोघे बापलेक अर्वाच्च शिवीगाळ करीत धावून गेले. याप्रकरणी व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून संजय वर्पे व त्याचा मुलगा गौरव याच्यावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अकोले बायपास रस्त्यावरील बलराम सहकारी पतसंस्थेत घडली. संस्थेतील कर्मचारी नियमित कामकाज करीत असताना साडेतीनच्या दरम्यान संजय लक्ष्मण वर्पे व त्याचा मुलगा गौरव हे दोघेही कार्यालयात आले. त्यांनी थेट व्यवस्थापक पद्माकर वसंत मतकर यांच्या दालनात जात त्यांना अरेरावी करू लागले. संजय वर्पे याने; ‘तू आमच्या शेतजमिनीवर जप्ती बोजा का चढवलास?, माझ्या मुलाच्या नावावर असलेल्या जमिनीवर बोजा का दाखवला?’ असे दरडावितच विचारणा करू लागला.
त्यावर व्यवस्थापक मतकर यांनी जमिनीवर बोजा कसा चढला, हे फाईल पाहिल्यानंतर लक्षात येईल असे समजूतीने सांगत त्यांना त्यांच्या कर्ज प्रकरणाची फाईलही दाखवली. चार वर्षांपूर्वी पतसंस्थेकडून जमिन तारण ठेवून 21 लाख 50 हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यापोटी एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे नियमानुसार ही प्रक्रिया झाल्याचेही त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्या बापलेकाने व्यवस्थापकावर हल्ला केला. टेबलवरील काचेचा पेपरवेट उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला,
मात्र ते वेळीच खाली वाकल्याने त्याचा प्रहार पाठीला सहन करावा लागला. मतकरांची सहा महिन्यांपूर्वीच अतिशय अवघड शस्त्रक्रिया झाली होती. त्याचीही माहिती मारहाण करणार्या दोघांना होती. गचांडी पकडून मतकरांचे डोके टेबलवर आपटले. त्यामुळे टेबलवरील काच फूटून डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यातून रक्तस्राव सुरु झाला. महिला कर्मचारी व्यवस्थापकाच्या मदतीला धावल्या.
मात्र, बापलेकाने त्यांनाही घाणेरड्या शैलीत शिवीगाळ व दमदाटी करीत मागे लोटले. दोघांनी बराचवेळ पतसंस्थेच्या कार्यालयात धुडगूस घालत टेबलवरील काचा फोडून इतर सामान व कागदपत्रांची नासधूस केली.अन्य कर्मचार्यांनी त्यांना रुग्णालयात नेवून उपचार केले.याप्रकरणी व्यवस्थापक पद्माकर मतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिकणी येथील संजय लक्ष्मण वर्पे व त्याचा मुलगा गौरव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.