पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस विविध प्रकल्पांना विरोध करत आहे. मात्र, हेच प्रकल्प स्थायी समितीत पक्षाचे सदस्य मान्य करतात. त्यामुळे राष्ट्रवादीला टीकेचा सामना करावा लागत आहे. आता भाजपचा निवडणूक अजेंडा रोखण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आणि अश्विनी कदम यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेने आपले सदस्य कायम ठेवले आहेत.
स्थायी समितीमधील आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपत आहे. या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी सोमवारी खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडीत भाजपने पूर्वीचे सदस्य असलेल्या नगरसेवक मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, वर्षा तापकीर, उज्वला जंगले यांना पुन्हा संधी दिली. तर शिवसेना आणि कॉंग्रेसने विद्यमान सदस्य अनुक्रमे बाळा ओसवाल, लता राजगुरू यांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र विद्यमान सदस्य नंदा लोणकर आणि अमृता बाबर यांना संधी न देता, विशाल तांबे आणि अश्विनी कदम यांना संधी दिली आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी स्थायी समितीच्या आणखी दोन बैठका होणार आहेत. यात भाजपकडून शहराचे मोठे प्रकल्प मान्यतेसाठी आणले जाणार आहेत. या प्रकल्पांना आक्रमकपणे विरोध करण्याची जबाबदारी कदम आणि तांबे यांच्यावर असेल.
रासनेंचा अध्यक्षपदाचा चौकार
विद्यमान स्थायी समिती अध्यक्षांची मुदत 28 फेब्रुवारीला संपत आहे. नवीन अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त 7 मार्च रोजी आपले अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी स्थायी समितीच्या नूतन अध्यक्षांची निवड होणार आहे. यावेळी अध्यक्षपदाची माळ सलग चौथ्यांदा रासने यांच्या गळ्यात पडणार आहे. 14 दिवसांसाठी भाजपने पुन्हा त्याच चार सदस्यांना संधी दिल्याने रासने यांचे अध्यक्षपद निश्चित मानले जात आहे.