पिंपरी – गेल्या पाच वर्षांत भाजपने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. रोज एकजण राजीनामा देत असून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून एकही नगरसेवक बाहेर पडणार नसून भाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी आता पक्षात भरती होईल हे विसरून जावे आणि आपल्या पक्षातून होत असलेली गळती रोखावी, असा टोला राष्ट्रवादीचे माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी भाजपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांना लगावला आहे.
भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी नुकताच भाजपा सदस्यत्वाचा व नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते लवकरच प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर योगेश बहल यांनी आज पलटवार करत ढाके यांना टोला लगावला आहे.
याबाबत योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. वसंत बोराटे यांच्यानंतर आज चंदा लोखंडे यांनी राजीनामा दिला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत अनेकजण भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. ढाके यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षातील गळती रोखावी आणि त्यानंतरच भरतीची दिवास्वप्ने पहावीत, असा टोलाही बहल यांनी लगाविला आहे.