पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आयुक्तांच्या अनुपस्थितीत अंदाजपत्रक सादर झाले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शुक्रवारी (दि. 18) स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले. मात्र यावेळी आयुक्तच अंदाजपत्रक सादर करण्यासाठी उपस्थितीत नसल्याने स्थायी समितीच्या विशेष बैठकीत सदस्यांनी आयुक्तांचा निषेध केला. त्यानंतर माझ्या घरातील लग्न असल्याने मी रजा घेतली असल्याचा खुलासा आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी
(दि. 20) केला.
महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयुक्तांची छाप असते. शहरातील नागरिकांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकातून नागरिकांना काय मिळणार याची देखील उत्सुकता असते. तसेच अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आयुक्त आवर्जून उपस्थित राहत असतात.
मात्र पिंपरी महापालिकेचे 2022-23 चे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आयुक्तच उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले होते.
त्यावर पत्रकार परिषदेत आयुक्तांनी खुलासा केला. ते म्हणाले, माझ्या घरातील लग्न होते. त्यासाठी मी पंधरा दिवसापूर्वीच सरकारकडे रजा मागितली होती. गेल्या वर्षभरामध्ये मी एकही सुट्टी घेतली नाही. 21 फेब्रुवारीनंतर तारीख जाहीर केली होती. मात्र 20 फेब्रुवारीपूर्वी अंदाजपत्रक सादर करणे असा नियम आहे.
त्यामुळे घरातील लग्न आणि 20 फेब्रुवारीपूर्वी अंदाजपत्रक सादर करणे अशा दोन्हीही गोष्टी होत्या. त्यामुळे अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्तांनी सादर केले असल्याचा खुलासा आयुक्त पाटील यांनी केला.