पुणे- शालेय शिक्षण विभागातील प्रलंबित फायलींचा निपटारा जलद गतीने करावा. आहे ती कामे नीट व वेळेतच पूर्ण करा अन्यथा कारवाई करण्यात येईल. मालप्रॅक्टिस पूर्ण बंद व्हावी यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवा, अशा शब्दांत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
राज्यातील सर्व विभागांचे शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांची शिक्षण आयुक्तांनी ऑनलाइन बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. शिक्षण आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मांढरे यांनी कार्यालयांना भेटी देण्याचा धडाका लावला. आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांना भेटी देऊन त्या ठिकाणचा कारभार पाहिला. आणखी कार्यालयांना भेटी देण्याचे सत्र सुरूच राहणार आहे. दरम्यान, कार्यालयातील अडीअडचणी, सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिक्षण आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून सूचनाही जाणून घेतल्या.