कराड – कराड ते पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सोमवारी कराड येथे झालेल्या मतमोजणीमध्ये गुरूजन एकता पॅनेलने 21 पैकी 18 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवून आणले. सोसायटीसाठी 19 जागांसाठी तब्बल 68 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये गुरूजन एकता पॅनेल व सत्ताधारी श्री गुरूमाऊली पॅनेलमध्ये जोरदार लढत झाली. मतमोजणी दरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंत दोन्ही पॅनेलमध्ये चांगलीच चुरस असल्याचे दिसून आले. अखेर गुरूजन एकता पॅनेलने 18 जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले.
कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सुरु होती. यामध्ये सत्ताधारी व विरोधक अशा दोन्हींकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यात आले. तसेच प्रचाराचाही चांगलाच धडाका होता. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले.
या निवडणुकीत शिक्षक समिती, शिक्षक संघ (संभाजीराव थोरात), कै. शिवाजीराव पाटील शिक्षक संघ, दोंदे शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारती शिक्षक संघटना यांचे संयुक्त गुरुजन एकता पॅनल, तसेच कै. शिवाजीराव पाटील प्रणित श्री गुरुमाऊली पॅनल यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. यामध्ये गुरूजन एकता पॅनेलने आपला करिष्मा दाखवत सत्ताधारी श्री गुरुमाउली पॅनेलला धोबीपछाड देत सत्तांतर घडवले. या विजयानंतर गुरूजन एकता पॅनेलचे नेते संभाजीराव थोरात यांच्यासह सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या इमारतीत एकत्र येत गुलालाची उधळण करीत विजयी जल्लोष केला. तसेच या विजयात हातभार लावलेल्या सर्वांचे संभाजीराव थोरात यांनी आभार मानले.