पुणे – करोना विषाणूमुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असतानाच, जनता सहकारी बॅंक लिमिटेड पुणेने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत दि.21 रोजी बॅंकेच्या बाजीराव रस्त्यावरील मुख्य शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि 108 बॉटल्स रक्त संकलन केले. यामध्ये बॅंकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
रक्तदानाच्या वेळी दहा पेक्षा जास्त संख्या एकत्र जमणार नाही, याची यावेळी काळजी घेण्यात आली होती. जनता बॅंक स्टाफ वेलफेअर असोसिएशन आणि बॅंक व्यवस्थापनाने या शिबिराचे आयोजन केले होते. असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद पोटभरे आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी दिली. यावेळी लेले म्हणाले, “पुणे शहरात करोनामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
बॅंकेत ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून, जनजागृती करण्यात येत आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे ग्राहकांना सेवा सुविधा देता यावी, यासाठी सोमवार दि. 23 मार्चपासून बॅंकेचे कामकाज सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या वेळेत सुरू राहणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.