पुणे – पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यांतून रेल्वेमार्गासाठी 575 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करून जमिनी खरेदी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच घेतला. त्यामध्ये हा प्रकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रेल्वे मार्गासाठी निधी कसा उभारायचा यावर निर्णय होणार आहे.
एका बाजुला निधी उभारण्याची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजुला भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 575 हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. भूसंपादनासंदर्भात रेल्वे विभागाकडून हवेलीमधून सहा प्रस्ताव दाखल झाले आहेत.
या 575 हेक्टर जमिनीसाठी 1300 ते 1500 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी जमिनीचे कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. तसेच, मोजणी करण्याच्या सूचना भूमिअभिलेख विभागाला देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.