मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार

रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे यांची माहिती

मुंबई – महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात वेगवेगळ्या कामांसाठी मजुरांची आवश्‍यकता असते मात्र आज अनेक कामांसाठी मजूर मिळत नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना विभागाच्या माध्यमातून मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी पुढील काळात व्यापक स्तरावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. 

स्वयंसहाय्यता, बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार हमी योजनेमार्फत विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

आज अनेक ठिकाणी अकुशल मजूर मिळतात पण ते कामावर येण्यास तयार नसतात. येणाऱ्या काळात मजुरांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदविणे यादृष्टीने काम करण्यात येणार आहे. मजूर उपस्थिती वाढविण्यासाठी ग्रामसभा आणि बचत गट यांचाही आधार घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरावरील सर्व लोक प्रतिनिधींना रोहयोबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही बनसोडे यांनी सांगितले.

रोहयो मजूरांना मजुरी विहीत कालावधीत मिळेल याबाबत दक्षता घेणे आवश्‍यक आहे. या योजनेबाबत दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात यावा. रोहयो कामाची रक्कम मजूरांना लगेच अदा करण्यात यावी. कामाच्या ठिकाणी मजुरांना मिळणाऱ्या सुविधा उदाहरणार्थ प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, पाळणाघर या सुविधा मिळतील याबाबत दक्षता घेण्यात यावी, असेही बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना यशस्वी करण्यासाठी बचत गटातील महिलांनी/प्रतिनिधींनी पुढाकार घेत ही योजना यशस्वी करणे आवश्‍यक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबविण्यात येत आहे.

शेतीसोबत शेती पूरक व्यवसायाला चालना मिळावी, ग्रामीण आर्थिकचक्राला चालना मिळावी यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पूर्ण होणार आहे.

मनरेगा योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेंतर्गत 4 वैयक्तिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. शेतीपूरक व्यवासायातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, असेही बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.