पुणे –प्रतिभावंत गायक, अभिनेते मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी मला शिकविले आहे. ते इतके मोठे आहेत हे कळण्याचे तेव्हा माझे वयही नव्हते. पुणे भारत गायन समाजाच्या संपूर्ण संगीत अभ्यासक्रमाची निर्मिती कृष्णरावांनी केली आहे. त्यांच्या परीसस्पर्शातून माझी जडणघडण झाली, अशी भावना मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांनी व्यक्त केली.
मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षानिमित्त माधव कृष्णराव ऊर्फ राजाभाऊ फुलंब्रीकर परिवार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ संगीत समीक्षक मा. कृ. पारधी, ज्येष्ठ लेखक रवींद्र जोशी आणि पुणे भारत गायन समाज संस्थेचे सुहास दातार यांना “मास्टर कृष्णराव स्मृती पुरस्कारा’ने आज सन्मानित केले. यावेळी राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, प्रिया फुलंब्रीकर, मंजुश्री छत्रे आदी उपस्थित होते. दातार यांच्या वतीने त्यांच्या कन्या संगीता दातार, सावनी दातार-कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. दरम्यान, नृत्यमुकुला संस्थेच्या कलावंतांनी भरतनाट्यम रचना केली. तर साहिल पुंडलिक यांनी भैरवीतील भजन गात सोहळ्याची सांगता केली.
मास्टर कृष्णरावांनी स्वरबद्ध केलेली बुद्धवंदना आणि वंदे मातरम् या दोन गोष्टीचे गारुड अजूनही असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेली “बोला अमृत बोला’ आणि “लख लख चंदेरी’ या नुसत्या दोन गीतांमधून त्यांची अभिजात संगीतातील सौंदर्यदृष्टी दिसते, असे पारधी म्हणाले.