तातडीने सुधारणा करण्याचे धोरण : सर्वेक्षण अहवाल आठ दिवसांत
पुणे – महापालिका हद्दीतील सर्व दवाखाने तसेच रुग्णालयामध्ये शासकीय नियमांप्रमाणे अत्यावश्यक सर्व सुधारणा करून ती सुसज्ज केली जाणार आहेत. त्यासाठी या रुग्णालयांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आठ दिवसांत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
महापालिकेची शहरात 17 रुग्णालये तसेच सुमारे 63 दवाखाने आहेत. मात्र, त्यातील एकही दवाखान्यात आयसीयू तसेच इतर शासकीय निकषांप्रमाणे वैद्यकीय सुविधा नाहीत. त्यामुळे करोनासारख्या गंभीर आजारांचा सामना करताना प्रशासनाला या सुविधाची कमतरता भासत असून पालिकेची केवळ दोनच रुग्णालये या आजारांसाठी वापरली जात आहेत.
तर रुग्णांसाठी क्रीडा संकुल आणि वसतिगृह वापरण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशी स्थिती उद्भवल्यास आरोग्य यंत्रणा सक्षम असावी, या उद्देशाने करोनाचा अनुभव लक्षात घेऊन ही रुग्णालये सुसज्ज केली जाणार आहेत. त्यामुळे शासकीय निकषांनुसार कोणत्या सुविधा असाव्यात आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याचा अहवाल आयुक्तांनी मागविला आहे. तर यासाठी येणारा खर्च “सीएसआर’मधून करण्याचे नियोजन असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.