प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 28 – सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. परिणामी, पुणे महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (दि. 30) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. एकूण 46 जागांसाठीची ही सोडत 148 जागांमधून काढली जाणार असून, यापूर्वी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने ज्या जागा खुल्या गटासाठी उपलब्ध झाल्या होत्या. त्या प्रभागात हे आरक्षण असणार आहे. त्यामुळे खुल्या गटातील अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यातच, यात महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत नव्याने निघणार असल्याने अनेक प्रभागांतील उमेदवारांचे तिकिटच अडचणीत येणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचे प्रभाग निश्चित असून, 173 नगरसेवक असणार आहेत. त्यात, 57 प्रभाग 3 सदस्यांचे तर 1 प्रभाग दोन सदस्यांचा आहे. या पूर्वी आयोगाच्या आदेशानुसार, महापालिकेने या निवडणुकांसाठीच्या एससी आणि एसटीच्या 25 आरक्षित जागांसाठीचे आरक्षण काढले होते. तर उर्वरित 148 जागांमध्ये खुल्या गटातील महिलांसाठीचे आरक्षण काढण्यात आले होते. मात्र, पुन्हा न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मुभा दिल्याने आता उद्या (दि.29) नव्याने आरक्षण सोडत काढली जाईल. तर एससी आणि एसटीचे आरक्षित प्रभाग कायम राहतील. त्यामुळे उर्वरित 148 जागांमधून हे आरक्षण काढले जाणार असून, त्यात 74 जागा महिलांसाठी असून, 74 सर्वसाधारण गटासाठी असणार आहे. तर महिलांसाठीच्या 74 मधील 23 जागांवर ओबीसी महिलांसाठीचे आरक्षण असणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 11 वाजता ही सोडत काढली जाईल.