प्रभात वृत्तसेवा,पुणे, दि. 28 –चांदणी चौकात ओव्हरटेक करताना पीएमपी बस आणि टेम्पोमध्ये झालेल्या विचित्र अपघातामुळे चांदणी चौकातून साताराकडे जाणारी वाहतूक एक ते दीड तास बंद होती. अपघातानंतर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा गेल्या. सकाळी आठच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे ऑफीसला जाणारा नोकरवर्ग आणि शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
उड्डाणपुलाच्या कामामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. त्यामुळे नागरिक दररोज या कोंडीचा विचार करून वेळेआधीच बाहेर पडतात. मात्र, आज ऐन वर्दळीच्या वेळी चौकातील प्रथमेश इलाईट समोर निगडीहून कात्रच्या दिशेने निघालेल्या पीएमपी आणि टेम्पोचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध आल्यामुळे रस्ता ठप्प झाला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पवार यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे अपघातातील वाहने बाजूला करणे हाच पर्याय होता. त्यामुळे बावधन, पाषाण, मुंबई, मुळशी, भुगाव, एनडीएकडून येणाऱ्या वाहनांची कोंडी झाली. एक ते दीड तास वाहतूक ठप्प होती. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पालकांची धावपळ
ऑफीस आणि शाळेत जाणाऱ्यांची सकाळी गडबड असते. चांदणी चौकात झालेल्या अपघातामुळे अनेक कंपन्या आणि शाळेच्या बस कोंडीत अडकल्या. पर्यायाने ऑफीसवाल्यांनी स्वत:च्या गाड्या काढून ऑफीस गाठले तर कोंडीमुळे स्कुल बस येऊ शकत नाही, असा फोन आल्यामुळे पालाकांची धावपळ झाली.