पुणे – सर्दी, फ्ल्यू सदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती खासगी क्लिनिक्सनी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. सुमारे साडेतीन हजार दवाखाने, क्लिनिक आणि डिस्पेन्सरी यांना हे आदेश दिले आहेत.
करोनाची सौम्य लक्षणे असतानाच संबंधितांना वेळीच उपचार देऊन करोनामुक्त करणे तसेच दमा, “सारी’ या आजारावरही वेळेत उपचार करणे हा या मागचा उद्देश आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील खाजगी क्लिनिकमध्ये दररोज शेकडो नागरिक सर्दी, खोकला, ताप आल्यास तपासणीसाठी जातात आणि औषधे घेतात.
परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व रुग्णांची माहिती महापालिकेने मागवण्याचे ठरवले असून, याबाबतचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत. यापुढे सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक आणि डिस्पेन्सरीमध्ये करोनासदृश लक्षणे असलेल्या रूग्णांची माहिती संबंधित आस्थापना अथवा डॉक्टरांना ठेवावी लागणार आहे.
तसेच ती दैंनदिन स्वरूपात संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ईमेलव्दारे कळवावी लागणार आहे. यामध्ये रूग्णाचे नाव, वय, लिंग, पत्ता, संपर्क क्रमांक, आजाराचा प्रकार, ऑक्सिजनची पातळी आणि अन्य आजार ही माहिती नमूद करणे आवश्यक आहे.