पुणे – केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याने महापालिकेनेही अंदाजपत्रकासाठी लगबग सुरू केली आहे. जानेवारीमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2024-25 आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक डिसेंबर 2023 च्या अखेरीस मनपा आयुक्त सादर करणार आहेत.
दरवर्षी जानेवारीमध्ये हे अंदाजपत्रक सादर केले जाते. तर, स्थायी समिती त्याला 31 मार्चपूर्वी मान्यता देते. मात्र, महापालिकेवर गेल्या दीड वर्षांपासून प्रशासक नियुक्त असल्याने आयुक्तच स्थायी समिती आणि मुख्यसभेत मान्यता देतात. मात्र, प्रशासकीय अडचण नको म्हणून यंदा डिसेंबर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच अंदाजपत्रक सादर केले जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सव संपल्यानंतर अंदाजपत्रकासाठीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना आतापासून चालू वर्षात झालेल्या खर्चाची तसेच दि.31 मार्चपर्यंत अपेक्षित खर्चाची माहिती तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सहा महिन्यांचा उत्पन्न आणि खर्चाचा आढावाही घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.