पुणे – मार्केट यार्डात सुरक्षेसाठी नेमलेले मेस्कोचे (महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादीत) सुरक्षारक्षकच दादागिरी करत आहेत. यामुळे आडत्यांसह विविध बाजार घटकातील लोक हैराण आहेत. मेस्कोची सुरक्षा “नको रे बाबा’ अशी भूमिका बाजार घटकांकडून घेण्यात येत आहे. मात्र, बाजार समिती प्रशासनाकडून याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणार तर कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत होत्या. त्यामुळे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी मेस्कोचे सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, चोऱ्या होण्याचे प्रमाण कमी झाले नाही. पूर्वीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी नाराज आहेत.
“मेस्कोची सुरक्षा निष्क्रिय आहे. फक्त प्रवेशद्वारावर उभे राहण्याचे आमचे काम आहे. बाजार आवारामध्ये गस्त घालणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे आवारात गस्तच नाही. परिणामी, चोरीच्या घटना घडत आहेत. त्याला जबाबदार कोण ?
-करण जाधव, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन.
दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजार आवारात गर्दी कमी असते. यावेळी चोरट्यांकडून टार्गेट करण्यात येते. त्यावेळी सुरक्षारक्षकांची गस्त वाढवावी, बाजार आवारात सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात यावी, अशा व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत.
“बाजार आवारातील काही घटकांकडून दादागिरीची भाषा केली जाते. नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे मेस्को आणि त्यांच्यात वाद घडत असतील. मात्र, विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका, अशा सुचना त्यांच्या वरिष्ठांना केल्या आहेत.
– मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती, पुणे
तर ग्राहकांशी वाद घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्राहकांसह बाजार घटकातील नागरिक नाराज आहेत.