आंबेगाव बुद्रुक – सिंहगड रोड येथील एसएस ऍडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी हरिश्चंद्रगडाचा 1800 फूट अजस्त्र कोकणकडा रोपच्या साह्याने रॅपलिंग करत उतरला. कोकणकडा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा. उंची सुमारे तीन हजार फूट. याच कड्याचा सरळ उभा 1800 फूट भाग रॅपल केला.
शिवजयंतीनिमित्त अनोखी मानवंदना देण्यासाठी कोकणकडा रॅपलिंग मोहीम टीमने आखली होती. राजूरमार्गे पाचनई गावामध्ये पोहोचल्यावर एक वाट हरिश्चंद्रगडाकडे जाते. कोकणकडा हा गडाचाच एक भाग. सकाळी लवकर उठून सेट-अप लावला. पूजन झाल्यावर कृष्णाने मरगळे यांनी रापलिंगचा श्रीगणेशा केला. त्यापाठोपाठ मानसिंह चव्हाण, विकास जोरकर, तुषार दिघे, रोहित आंदोडगी यांनीदेखील कडा उतरला.
चार-पाच फुटांनंतर ओव्हरहॅंग लागतो. गिर्यारोहक खडकापासून दूर गेल्यावर हवेमुळे गोल-गोल फिरू लागतो. एवढ्या उंचीवर तोल सांभाळून रॅपलिंग करत संपूर्ण टीमने यशस्वीपणे मोहीम पार पाडली. उतरताना कोकणकडा नजरेत मावत नाही. जवळपास 800-900 फूट कातळाचा स्पर्श होत नाही. रोप डिसेंडरमधून फिरवायला खूप मेहनत घ्यावी लागते.
रॅपल संपल्यावर कसोटी होती नळीची वाट चढण्याची, टीम परत ट्रॅव्हर्स मारून नळीची वाट चढून 8 वाजता परत गडावर पोहोचली. गडावर सर्वांचे जल्लोषात स्वागत झाले. होळी पेटवण्यासाठी गडावर सर्वजण वाट पाहत होते. गडावरच्या पारंपरिक होळीला नैवद्य दाखविण्यात आला.