पुण्यात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध पण व्हेंटिलेटरचा तुटवडा

485 ऑक्‍सिजन बेड शिल्लक

पुणे – शहरात करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑक्‍सिजन बेडची जेमतेम उपलब्धता आहे; परंतु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरयुक्‍त आणि विना व्हेंटिलेटर बेड मात्र मिळत नसल्याची स्थिती आहे. विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर रविवार आणि सोमवारीही दिवसभर शहरातील एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटरयुक्‍त बेड उपलब्ध नव्हते. सोमवारी रात्रीपर्यंत 485 ऑक्‍सिजन बेड शिल्लक होते.

रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऑक्‍सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर बेडची मागणी केली जाते. त्यासाठी पालिकेच्या हेल्पलाइन नंबरला कॉल करावा लागतो; परंतु रुग्णसंख्या लक्षात घेता पालिकेचा फोन बिझी लागतो. नातेवाईकांना रुग्णालयांचे नंबर पाठवण्यात येतात आणि स्वत:च “ऍरेंजमेंट’ करण्यासंबंधी सांगितले जाते. डॅशबोर्डवर बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

रविवार संध्याकाळपर्यंत डॅशबोर्डवर 4 हजार 137 ऑक्‍सिजनयुक्‍त बेड पैकी 261 च बेड शिल्लक दाखवले जात होते. मात्र व्हेंटिलेटर बेड आणि आयसीयूमधील विना व्हेंटिलेटर बेड मात्र उपलब्ध नव्हते. सोमवारी मात्र एकूण 300 ऑक्‍सिजन बेड वाढवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. सोमवारी रात्रीपर्यंत 485 बेड शहरात शिल्लक होते. त्यांचा समावेश करून महापालिकेकडे आता 4437 ऑक्‍सिजन बेड झाले आहेत.

जंबोमध्ये 100 बेड वाढवले
सीओईपीतील जंबो रुग्णालयात आणखी शंभर बेड रविवारी वाढवण्यात आले असून, त्यांची क्षमता आता 600 बेडची झाली आहे. या आधी पाचशे बेड सुरू करण्यात आले आहेत. सध्याच्या 600 मधील 500 बेड हे ऑक्‍सिजनयुक्‍त आहेत. याशिवाय महापालिकेने खासगी रुग्णालयातील 200 ऑक्‍सिजनबेड वाढवले असून, त्यांचा समावेश करून महापालिकेकडे आता एकूण 6 हजार 553 बेड नियंत्रणाखाली आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.