‘या’ कारणामुळे कमी होऊ शकतो रक्तदाब ; जाणून घ्या घरगुती उपाय

हायपोटेन्शन किंवा लो-ब्लडप्रेशरमध्ये रक्‍तदाब हा सामान्य दाबापेक्षा कमी होतो. सतत रक्‍तदाब कमी राहिला तर ऑक्‍सिजन आणि इतर महत्त्वाचे क्षार घटक मेंदूपर्यंत पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात. याचा परिणाम वेड लागण्यापासून ते मृत्यू येण्यापर्यंत होऊ शकतो.

डिहायड्रेशन ः
डिहायड्रेशन हा त्रास म्हणजे दीर्घकाळ येणारा नॉशिया, व्यायाम, खूप जास्त घाम येणे, उष्माघात उलट्या, जुलाब इत्यादीमुळे होणारा आजार होय. अशा वेळी ताबडतोब पाणी घेतले नाही तर कमी रक्‍तदाबाचा त्रास उद्‌भवतो. डोके हलके पडणे, अशक्‍तपणा येणे किंवा चक्‍कर येणे ही त्याची लक्षणे आहेत.

रक्‍तस्त्राव ः
तीव्र किंवा थोडा रक्‍तस्त्राव हे सुद्धा कमी रक्‍तदाबाचे कारण ठरू शकते. अपघात शस्त्रक्रिया किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे रक्‍तस्त्राव झाला तरीही हा त्रास होऊ शकतो.

सूज – दाह
शरीराच्या कुठल्याही अवयवावर येणारी सूज किंवा होणारा दाह हे कमी रक्‍तदाबासाठी कारणीभूत ठरू शकताते. तसेच हृदयाचे स्नायू कमकुवत असल्यास कमी रक्‍तदाबाची शक्‍यता अधिक वाढते किंवा त्याचा धोका अधिक असतो हे लक्षात घ्यावे. हे स्नायू कमकुवत असल्यास हृदयक्रिया मंदावते आणि त्यामुळे कमी प्रमाणात रक्‍त पंप होते. तसेच हृदयाच्या स्नायूंना विषाणूंचा संसर्ग झाला तरीसुद्धा रक्‍तदाब कमी होऊ शकतो. हृदयामध्ये ब्लॉकेज तयार झाले तर हृदयविकाराचा झटका येतो. यावेळीसुद्धा रक्‍तदाब कमी होऊ शकतो. हृदयाचे ठोके अधिक प्रमाणात पडत असतील तरी कमी अथवा अनियमित असतील रक्‍तदाबाचा त्रास होतो. गरोदरपणात रक्‍तदाब कमी होतो. कारण या वेळी शरीरांतर्गत अनेक बदल होत असतात.

तीव्र संसर्ग ः
सेप्टीक किंवा तीव्र संसर्ग झाल्यास रक्‍तदाब कमी होतो. जीवाणू फुप्फुसे किंवा पोटाच्या माध्यमातून रक्‍तप्रवाहात शिरतात तेव्हा हा त्रास होतो. कारण ही जीवाणू विषारी घटक तयार करू लागतात. त्याचा पारिणाम रक्‍तवाहिन्यांवर होतो आणि त्यामुळे रक्‍तदाब कमी होतो.

पोषक घटकांची कमतरता ः
चांगल्या आरोग्यासाठी उत्तम पोषक घटकांची गरज असते. एखाद्या पोषक घटकाची अतिशय कमी कमतरता देखील गुंतागुंत निर्माण करू शकते आणि त्यामुळे रक्‍तदाब कमी होऊ शकतो.

अतंस्त्रावी ग्रंथीच्या समस्येमुळे ः
अतंस्त्रावी ग्रंथींचा समस्या म्हणजे हायपोथायरॉईडीझम. पॅराथायरॉईड डिसीज, रक्‍तातील साखर कमी होणे किंवा मधुमेह यामुळे रक्‍तदाब कमी होतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये बिघाड झाला म्हणजे हे आजार होतात आणि त्यामुळे रक्‍तदाब कमी होऊ शकतो.

कमी रक्‍तदाबावरील उपाय ः
रक्‍तदाब कमी झाल्यास मीठाचे पाणी उपयोगाचे ठरते. कारण मीठामधील सोडियम रक्‍तदाब वाढवते. अर्थात हा उपाय खूप जास्त प्रमाणात करू नये. कारण अतिरिक्‍त मीठ हे आरोग्यासाठी चांगले नसते. ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा टी स्पून मीठ घालावे आणि ते पाणी प्यावे. एखादे कोल्ड्रींकसुद्धा उपयुक्‍त ठरू शकते.

एक कपभर स्ट्रॉंग कॉफी, हॉट चॉकलेट, कोला किंवा कॉफी असणारे कुठलेही पेय हे तात्पुरत्या वेळेसाठी रक्‍तदाब वाढवते. ज्यांना सातत्याने कमी रक्‍तदाबाचा त्रास होतो, अशा व्यक्‍तींनी रोज सकाळी एक कपभर कॉफी घ्यावी. अर्थात याची सवय लावून घेऊ नये.

मनुका ः
हायपोटेन्शन किंवा कमी रक्‍तदाब यावर नैसर्गिकरीत्या उपयुक्‍त ठरणारा उपाय म्हणजे, मनुका खाणे होय. कपभर पाण्यात 30-40 मनुका भिजवून ठेवाव्यात. सकाळी रिकाम्या पोटी या मनुका खाव्यात. भिजवलेल्या मनुकांचे पाणी देखील पिऊन घ्यावे. काही आठवडे किंवा महिन्यापर्यंत हा उपाय करावा. तसेच 10-12 बदाम, 15-20 शेंगदाणे आणि 10-15 काळ्या मनुका एक ग्लासभर दुधामध्ये टाकून खाव्यात.

तुळस ः
कमी रक्‍तदाबावर तुळसही फायदेशीर ठरते. कारण यामध्ये क जीवनसत्व भरपूर असते. तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि पॅन्टोथेनीक ऍसिड भरपूर असते. तसेच यामुळे मन संतुलित राहाते आणि ताण कमी होतो. तुळशीच्या 10-15 पानांचा रस घ्यावा त्यामध्ये एक चमचा मध घालावा. रोज सकाळी रिकाम्या पोटी हा रस घ्यावा. तसेच रोज सकाळी चार ते पाच तुळशीची पाने तोंडात घेऊन ती व्यवस्थित चावून खावीत. याचाही चांगला फरक दिसतो.

ज्येष्ठमध ः
ज्येष्ठमधाची मुळेही कमी रक्‍तदाबाचा त्रास कमी होण्यासाठी उपयुक्‍त ठरतात. एक चमचा ज्येष्ठमध किंवा त्याची पावडर घेऊन एक कप पाण्यामध्ये पाच मिनिटे उकळवावी. हे पाणी रोज काही दिवसांपर्यंत घ्यावे किंवा ज्येष्ठमधाच्या 400 ते 500 एमजीच्या गोळ्याही बाजारात उपलब्ध आहेत त्या घ्याव्यात.

बिटाचा रस ः
कच्च्या बिटाचा रस हा उच्च आणि कमी रक्‍तदाबामध्ये उपलब्ध ठरू शकतो. कपभर बिटाचा रस दिवसातून दोन वेळा एक आठवड्यापर्यंत घ्यावा. तसेच इतर नैसर्गिक फळांचे रस कमी रक्‍तदाबासाठी उपयुक्‍त ठरतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.