पुणे : मुठा नदीच्या तब्बल १०० फूट खालून सोमवारी पुणे मेट्रो अखेर धावली आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशा सुमारे ३.४ किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मेट्रो ट्रेनने सुमारे १ तासात हे अंतर पार केले असून, शहरासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. हा मेट्रो मार्ग शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या खाली सुमारे १०० फूट असून, तो पूर्णत: काळ्या पाषाणात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने लवकरच स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मार्ग पुणेकरांसाठी सुरू होण्यासाठी मेट्रोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
हा मार्ग मेट्रो सेवेचा गेमचेंजर ठरणार आहे. पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे यामुळे शक्य होईल, तसेच कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बसस्थानक, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रस्ता, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, नेहरू स्टेडियम ठिकाणी मेट्रोने जाणे नागरिकांना शक्य होणार आहे.
अशी झाली चाचणी
मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर चाचणी पूर्ण केली. आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी चाचणी सुरू केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो ट्रेन ११ वा. ५९ मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानक येथे पोहोचली. या चाचणीसाठी १ तास वेळ लागला. या चाचणीदरम्यान मेट्रोचा वेग ताशी ७.५ किमी इतका ठेवण्यात आला होता.
१०० फूट खोल मार्ग आणि स्थानके
सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या चाचणी मार्गावरील सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणे ही पुणे शहरात होणारी ऐतिहासिक घटना आहे. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ३३.१ मीटर खोल, बुधवार पेठ स्थानक ३० मीटर खोल, मंडई स्थानक २६ मीटर खोल आणि स्वारगेट स्थानक २९ मीटर खोल आहे. भुयारी मार्गाचे खोदकाम काम दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सुरू करण्यात आले आणि एकूण १२ किमी भुयारी मार्गाचे खोदकाम काम दिनांक ४ जून २०२२ रोजी पूर्ण झाले.
“सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक मार्गावरील चाचणी ही पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांसाठी ऐतिहासिक घटना आहे.” – श्रावण हर्डीकर ( व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो )