पुणे – शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मार्ग अंतिम टप्प्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही मार्गावर मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यात, वनाज ते रामवाडी मार्ग नोव्हेंबर 2023 मध्ये तर स्वारगेट पर्यंतचा मार्ग जानेवारी 2024 च्या अखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.
त्यामुळे, पुढील सहा महिन्यात सुमारे 32 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार असून पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा नवा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या वनाज ते रामवाडी मार्गावर वनाज ते रूबी हॉलपर्यंत मेट्रो सेवा सुरू आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्टपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली असून हे दोन्ही मार्ग पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहेत.
रामवाडी मार्ग 90 टक्के पूर्ण
रुबी हॉल ते रामवाडीपर्यंतचे मेट्रो मार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावर केवळ स्थानकांसाठीच्या आत जाण्याच्या आणि बाहेर येण्याच्या मार्गांचे काम शिल्लक राहिले आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने महामेट्रोने हे काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर 2023 ही डेडलाईन निश्चित केली आहे. त्यामुळे, पुढील दिवसांत रूबी हॉल ते रामवाडीपर्यंत ट्रायल रन सुरू करण्याचे नियोजन आहे.
बोगद्याचे काम पूर्ण
सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा सुमारे पाच किलोमीटरचा बोगद्याचा मार्ग आहे. या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रामुख्याने ट्रॅक तसेच विद्युत तारांच्या कामाचा समावेश होता. हे काम जवळपास पूर्ण झाले असून या मार्गात फडके हौद, मंडई तसेच स्वारगेट ही स्थानके आहेत. या तीनही स्थानकांचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर ही सर्व स्थानके भूमीगत असल्याने ती पूर्ण होण्यास थोडा वेळ लागत असल्याने या मार्गाचे काम जानेवारी 2024 अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
“मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. रामवाडीपर्यंत नोव्हेंबर 2023 अखेर तर स्वारगेटपर्यंतचा मार्ग जानेवारी 2024 अखेर सुरू करण्याचे नियोजन आहे. दोन्ही मार्गावरील फक्त स्थानकांची कामे शिल्लक राहिली असून ट्रायल रन सुरू करण्यात येणार आहेत.” – हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो