पुणे -कसबा विधानसभा निवडणुकीची जागा महविकास आघाडीने लढवावी, असा सूर मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी बैठकीत उमटला. दरम्यान, बैठकीनंतर शहर पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती पक्ष श्रेष्ठींना कळविण्यात आली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. कसबा विधानसभा मतदार संघासह पक्षाचे शहर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
कसबा विधानसभा मतदार संघ निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक होणार की बिनविरोध होणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, “या निवडणुकीनंतर मनपा निवडणुका होण्याची शक्यता असल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजप महापालिका निवडणुकीत या विषयावरून मुद्दा उपस्थित करत राजकारण करेल. तसेच या निवडणुकीचा फायदा घेईल. त्यामुळे महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवावी,’ अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. तर, “या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असून पक्षाने ही जागा घ्यावी’ अशी मागणीही काही पदाधिकाऱ्यांनी केली.
मात्र, “आघाडीच्या जागा वाटपात ही जागा नेहमी कॉंग्रेसकडे असल्याने ही जागा त्यांनाच जाण्याची शक्यता असली, तरी “महाविकास आघाडी’ म्हणून ही निवडणूक लढवावी, असा अंतिम निर्णय घेत ही भूमिका पक्षाच्या राज्यातील नेत्यांना कळविण्यात येणार आहे. त्यानुसार, पक्षाची पुढील भूमिका ठरविली जाणार आहे,’ असे जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कसबा विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी बैठक मंगळवारी होऊ शकली नाही.