पुणे – जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अर्ज भरण्याची तारीख अखेर ठरली आहे. पुढील आठवड्यात गुरूवारी ( दि.१८ ) रोजी महाविकास आघाडीकडून बारामती, पुणे आणि शिरूर मतदारसंघातील तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत. याच दिवशी महायुतीच्या बारामती आणि शिरूरच्या उमेदवारांचे अर्ज भरले जाणार आहेत.
दरम्यान, महायुतीच्या पुण्याच्या उमेदवाराचा अर्ज भरण्याच्या तारखेबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. या निमित्ताने दोन्ही गटांकडून पुण्यात मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते पुण्यात येणार असून, त्यांच्याकडून सभाही घेण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ एप्रिलपासून सुरू झालेली आहे. तर, पुणे आणि शिरूर मतदारसंघासठी १८ एप्रिलपासून अर्ज भरले जाणार आहेत.
महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज भरण्य़ासाठी स्वत: शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. अर्ज भरल्यानंतर सभेचे नियोजन करण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. तर महायुतीच्या बारामती आणि शिरूरच्या उमेदवारांचेही अर्ज भरले जाणार आहेत.
त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, महायुतीच्या पुण्यातील उमेदवाराच्या अर्जाबाबत अद्याप अर्ज भरण्याच्या तारीख निश्चित नसल्याचे सांंगण्यात येत आहे. त्यामुळे दि. २३ अथवा २५ एप्रिल रोजी अर्ज भरला जाऊ शकतो, असेही महायुतीच्या निवडणूक नियोजनात असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.