पुणे – अपघातात 50 टक्के अपंगत्व आलेल्या व्यक्तीला 23 लाख रुपये मिळणार आहेत. शनिवारी (दि. 9) झालेल्या लोकअदालतमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 4 सप्टेंबर 2019 रोजी ही घटना घडली.
38 वर्षीय व्यक्ती दुचाकीवरून पौडकडे कामाला चालला होता. मित्र दुचाकी चालवत होता. समोरून आलेल्या बोलेरू गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये जखमीचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना 50 टक्के अपंगत्व आले. त्यांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे ऍड. कांचन धामणकर यांच्यामार्फत दावा दाखल केला होता.
युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात 2020 मध्ये हा दावा दाखल करण्यात आला. युनायटेड कंपनीच्या वतीने ऍड. जयश्री वाकचौरे यांनी काम पाहिले. आलेले अपंगत्व, त्या व्यक्तीला दरमहा 12 हजार रुपये पगार होता. आलेले अपंगत्व, उपचारासाठी आलेला 5 लाख रुपये खर्च विचारात घेऊन 30 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली. तडजोडीअंती या दाव्यात 23 लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.