पुणे, दि. 23 -शहरातील वस्त्यांमधील मुले शिक्षणांच्या प्रवाहातून बाहेर पडून गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत असल्याने शहरात बाल गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत, अशा स्थितीत बेरोजगार व अल्पशिक्षीत युवक-युवतींसाठी पालिकेचा “लाइट हाऊस प्रकल्प’ आशेचा किरण ठरला आहे.
गेल्या सहा वर्षांत या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल 9 हजार 626 मुलांना शहरातील महिंद्रा, मेट्रो ग्लोबल, इन्फोसिस, न्यासा अशा संस्थामध्ये रोजगार मिळाला आहे. तर, शेकडो युवक-युवतींनी स्वत:चे रोजगार सुरू करीत इतरांच्या हातांना काम दिले आहे.
असा आहे हा प्रकल्प…
महापालिकेकडून स्मार्ट सिटी उपक्रमा अंतर्गत 2016 मध्ये लाइट हाऊस-कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना प्रवेश दिला जातो. या केंद्रात युवक-युवतींसाठीचे तब्बल 40 पेक्षा अधिक रोजगार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविले जातात. हे अभ्यासक्रम तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीचे आहेत. त्यात, युवतींसाठी तसेच युवकांसाठी वेगवेगळे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, हे प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी या युवकांना पहिल्या 20 दिवसांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिमत्व विकास, संगणक साक्षरता, स्पोकन इंग्लिश तसेच नोकरी विषयक मार्गदर्शनाचा फाउंडेशन कोर्स घेतला जातो. त्यात, स्वत:मधील क्षमता, कौशल्य, विविध खेळ सर्जनशिल उपक्रमातून या युवकांना कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठीच्या क्षमतांवर काम केले जाते. त्यानंतर, त्यांच्या आवडीच्या विषयाचे व्यावसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. तसेच, त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या कौशल्याशी संबंधित संस्थांमध्ये नोकरीसाठी त्यांना मदतही केली जाते. शहरात सद्यस्थितीत औंध, येरवडा, वारजे, भवानीपेठ, कोंढवा, वडगावशेरी, टिंगरेनगर, जनता वसाहत, कोथरूड, कसबा पेठ आणि बिबवेवाडी या भागात 12 लाइट हाऊस सुरू असून त्यात आतापर्यंत तब्बल 22 हजार युवकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 11 हजार 500 मुलांनी व्यावसायाभिमुख प्रशिक्षण घेतले असून 9626 युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
गॅरेज ते गुगलपर्यंतचे प्रशिक्षण
लाइट हाऊस प्रकल्पात सुमारे 40 पेक्षा अधिक वेगवेगळे रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. दुचाकी, चारचाकी गॅरेज पासून ते आयटी कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळासाठीचे इंटरनेट, नेटवर्किंग, संगणक प्रॉगॅमसाठीच्या आवश्यक असलेल्या लॅग्वेजचेही प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे शहरातील वस्ती पातळीवरील मुलांना हे सर्व प्रशिक्षण मोफत दिले जाते.
मी लाइट हाऊस प्रकल्पात स्वत: मसाले तयार करण्याचा व्यावसाय सुरू केला आहे. मी सध्या परदेशातही मसाले निर्यात करत असून लवकरच मी स्वत:चे स्नॅक्स सेंटर सुरू करणार असून मसाल्यांचा व्यावसायही विस्तारणार आहे.
– वंदना, प्रशिक्षण घेतलेली युवती
लाइट हाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून मी माझे संभाषण कौशल्य सुधारले. इंदीरा वसाहत इन्फोसिस हा माझा प्रवास लाइट हाऊसमुळे सुकर झाला. मी माझ्या प्रमाणेच या केंद्राच्या माध्यमातून इतरांसाठी मदत करणार आहे.
– अल्ताफ सय्यद, प्रशिक्षण घेतलेला युवक