पुणे – रस्ते दुरुस्तीचे निकष आणि कामाच्या गुणवत्तेला हरताळ फासत महापालिकेकडून अवघ्या दोन दिवसांपूर्वी भर पावसात दुरुस्त केलेला लक्ष्मी रस्ता अखेर काही तासांतच उखडला आहे.
या रस्त्यावर नव्याने केलेल्या डांबरीकरणावर खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी खडी रस्त्यावर आल्याने वाहने घसरू लागली आहेत. एवढेच काय कमी म्हणून या रस्त्यावर रांका ज्वेलर्सच्या समोर हा रस्ताही पावसाने खचला असून, काही वाहने त्यात अडकल्याचे प्रकार घडले आहेत.
शहरातील करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जूनपासून अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी (31 मे) जाहीर केला. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमधील खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेच्या पथ विभागाने सोमवारी भर पावसात हाती घेतले. मुसळधार पाऊस पडत असतानाही लक्ष्मी रस्त्यावर भर पावसात सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रस्ता डांबरीकरण करण्यात आले.
त्यानंतर मंगळवारी अनलॉकमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. परिणामी मंगळवारी दिवसभरात केलेले हे डांबरीकरणाचे काम उखडून गेले असून, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत; तर सर्वत्र खडी पसरली आहे. एवढेच नाही तर लक्ष्मी रस्ता अनेक ठिकाणी खचलेला असल्याचे बुधवारी दुपारी दिसून आले. त्यामुळे अशाप्रकारे निकृष्ट काम करून पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसऱ्यांदा डांबरीकरण…
लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीज ते मराठे ज्वेलर्सपर्यंतचा भाग खोदाईनंतर दोन वेळा डांबरीकरण करण्यात आला आहे. हा रस्ता यापूर्वी 15 मे रोजी डांबरीकरण करण्यात आला. त्यानंतर पुन्हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो उखडल्याने 31 मे रोजी पुन्हा त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा तो उखडला आहे.