येरवडा – दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेली अद्ययावत संगणक लॅब व दूरदृष्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) कक्ष प्रशिक्षणार्थीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. अंतर्गत मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सुरू करण्यात आलेल्या लॅब व व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी गुप्ता बोलत होते. यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वायचळ, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुकुल माधव फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त अनिल बाबी आदी उपस्थित होते.
गुप्ता म्हणाले की , अद्ययावत संगणक लॅब व व्हिडिओ कॉन्फरन्स कक्ष यासारख्या अद्ययावत सोयी सुविधांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणातून चांगले अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षकही निर्माण होणे आवश्यक आहे. लवकरच या ठिकाणी प्रशिक्षणाचे वर्ग सुरू होतील. अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यावहारीक ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे व चांगले शिक्षण प्राप्त करण्याची नितांत गरज असते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य नितीन वायचळ यांनी केले.