पुणे – महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे दोन शहरं अर्थचक्र फिरविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. दुसऱ्या लाटेत या दोन शहरांनाच करोनाचा दाट विळखा पडला होता. त्यामुळे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा पुण्याला अधिक प्रमाणात व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. यासंदर्भात सीरमचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सर्वाधिक करोना रुग्ण पुण्यामध्ये असल्याचे अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणा केली होती. पण त्यावर केंद्रातील मोदी सरकारने काहीच उत्तर दिले नसल्याचे सायरस पूनावाला यांनी म्हटलं.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोव्हिशिल्ड ही करोनाची लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.
पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना नोकरशाहीचा त्रास व्हायचा. आता कमी झाला असून याचे श्रेय मोदी सरकारला असल्याचेही पूनावाला यांनी म्हटले आहे. सीरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. पण आता पतिस्थिती बदलली आहे. करोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे.
कोव्हिशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. आम्ही ही लस अतिशय माफक दरात देत असल्याचेही यावेळी पूनावाला यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या एवढ्या नाममात्र किमतीत दिल्या असल्याचेही पूनावाला यांनी म्हटले आहे.