पारा 8 अंशांवर : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला
सर्वांत कमी तापमानाची परभणीत नोंद
पुणे – उत्तर-पूर्वेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. शहरातही चांगलीच थंडी जणवत असून, तापमानाचा पारा 8.1 अंशावर पोहचल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. तर, थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर येथे पुण्यापेक्षा जास्त म्हणजेच 11.3 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील उत्तर-पूर्व भागात म्हणजेच राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर या राज्यांसहित दिल्ली आणि उत्तरप्रदेश राज्याचा काही भाग या ठिकाणी थंडीची लाट असून, या ठिकाणाहून वेगाने थंड वारे वाहत आहेत. या थंड वाऱ्यांचा प्रभाव राज्यातही दिसून येत आहे. कोकणवगळता राज्यात सर्वत्र तापमान सातत्याने कमी होत असून, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविण्यात आला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान परभणी येथे 7.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.
विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, शिवाजीनगर वेधशाळेत किमान तापमान 8.1 अंश सेल्सिअस, पाषाण येथे 8.8 अंश सेल्सिअस आणि लोहगाव येथे 10.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. सरासरीच्या तुलनेत किमान तापमान 2.7 अंश सेल्सिअसने कमी आहे. दरम्यान, शहरात आणखी काळ थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
सावधानतेचा इशारा
शहरात थंडीचा चांगलाच कडाका जाणवत असून, अनेक ठिकाणी पहाटे तसेच सायंकाळी दाट धुके पदत आहेत. थंडीपासून बचावासाठी नागरिक, सुरक्षारक्षक हे शेकोटी पेटवत असल्याचेही दिसून येते. मात्र, या कडाक्याच्या थंडीतही नागरिक व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत. पण, थंडीबरोबरच हवेतील प्रदूषणही वाढत असून, करोना संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांनी विशेषत: श्वसनाचे विकार असलेल्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.