पुणे – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून बीआरटी मार्ग हटवला आहे. त्यात नव्याने रूंदीकरण होत असलेल्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. मात्र, यापूर्वीचा अनुभव पाहता या रस्त्यावर आता मध्यभागी बीआरटी मार्ग न उभारता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पीएमपी बससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पुण्याच्या हद्दीत लष्कराकडून खडकीतील २.१ किलोमीटर लांबीच्या रस्ता आहे. या रस्त्याची जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर पालिकेकडून या रस्त्यावर रूंदीकरणाचे काम सुरू असून, सुमारे ४२ मीटर रूंदीचा हा रस्ता असणार आहे. या रस्त्याचे काम ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
हे काम करताना अडीच मीटरचा दोन्ही बाजूंनी पादचारी मार्ग असणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने साडेतीन मीटरचा बससाठी मार्ग असेल. त्यांनतर छोटे दुभाजक लावले जाणार आहेत. त्यानंतर सव्वातीन मीटरच्या चार लेन या दुचाकी, चारचाकी यासह इतर वाहनांसाठी असणार आहेत. अशा प्रकारची रचना करणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.