पुणे – शहरात कोणताही रस्ता खोदायचा असल्यास पथ विभाग प्रमुख आणि संबंधित अतिरिक्त आयुक्तांची परवानगी घेऊनच रस्ता खोदाईस परवानगी द्यावी, असे आदेश असतानाच पथ विभागाचे कनिष्ट अभियंतेच खोदाईस परवानगी देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही आठवड्यांपूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खाजगी संस्थेला केबल टाकण्यासाठी खोदाई करू देणार्या पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.
अभिमानश्री सोसायटी आणि पाषाण रस्त्यावर हा प्रकार समोर आला आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर ढाकणे यांनी संबंधित अभियंत्याला विचारणा केली असता त्याने पाण्याच्या पाईपलाईनसाठी अत्यावश्यक बाब म्हणून खोदाई करण्यात आल्याची माहिती दिल्याची खोटी माहिती दिल्याने तडकाफडकी निलंबीत करण्याचे आदेश दिले.
काय घडला प्रकार?
आचार्य आनंद ऋषी चौक (पुणे विद्यापीठ चौक) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे, बाणेरकडे जाणारी वाहतूक पाषाण रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यातच, पाषाणकडून येणारी वाहने अभिमानश्री सोसायटीमधून मुख्य बाणेर रस्त्याला येऊन पुढे यशदा समोरून विद्यापीठ चौकात येतात. मात्र, पाषाण रस्त्यावर गेली तीन ते चार महिने जलवाहीनीचे कामामुळे मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आलेली होती. तर अभिमानश्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने होत असल्याने स्वत: अतिरिक्त आयुक्त ढाकने आणि पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी महिन्याभरापूर्वी रस्त्याची पाहणी केली.
त्यानंतर हा रस्ता दुरूस्त करत तो पूर्णत: नव्याने डांबरीकरण करण्यात आला. मात्र, आज सक़ाळी ढाकणे या रस्त्याच्या पाहणीसाठी गेले असता तोच रस्ता पुन्हा खोदल्याचे पाहून त्यांनी संबधित अभियंत्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने पाईपलाईनच्या खोदाईसाठी अत्यावश्यक बाब म्हणून खोदाई करण्यात आल्याचे ढाकणे यांना सांगितले.
परंतू या रस्त्यावरील पाईपलाईनच्या कामासाठी मी स्वत: पाणी पुरवठा विभागाकडे तगादा लावून वेळेत काम करून घेतले आणि रस्त्याचे डांबरीकरणही केले आहे, मग आता कोणत्या पाईपलाईनचे काम काढले? असा प्रश्न विचारला. तसेच खोदाईची परवानगी मागितली. मात्र, ही माहितीच अभियंत्याकडे नसल्याने अभियंत्यानेच खासगी केबलसाठी खोदाईस परवानगी दिल्याचे समोर आले आहे.