मिळकतकर लॉटरी बक्षीस वितरणास होत असलेल्या उशिराबद्दल “प्रभात’ने यापूर्वी प्रकाशित केलेले वृत्त
पुणे – कर संकलन वाढीसाठी महापालिकेने बक्षिसांची घोषणा केली होती. त्यासाठी लकी ड्रॉ काढत विजेत्यांची नावे जाहीरही केली. मात्र, ही लॉटरी काढून सव्वा महिना झाला, तरी विजेत्यांना बक्षीस वाटप झालेले नाही. आता दि. 19 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी पाच ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. शहरातील नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने पहिल्यांदाच ही योजना राबवली. त्यात, लकी ड्रॉ योजनेअंतर्गत पाच पेट्रोल कार, 15 ई-बाइक, 15 मोबाइल फोन, 10 लॅपटॉप, अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात आली.
दोन महिने आधी मनपा आयुक्तांनी बक्षिसांचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली होती. मात्र, त्यानंतरही लॉटरी निघेपर्यंत केवळ काही मोजक्याच बक्षिसांच्या साहित्याची खरेदी झालेली होती. तर, नेमकी कोणती कार खरेदी करायची यावरून वेळकाढूपणा सुरू होता.