दोन वर्षांनंतर गणेशोत्सवातील वास्तव; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण
पुणे – पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एक जागतिक पातळीवरील कुतूहलाची आणि मानाची गोष्ट आहे. विशेष करून करोनाच्या संकटात या असीम आनंदाला मुकलेल्या पुणेकर आणि बाहेरून आवर्जून या उत्सवाचा भाग होणाऱ्या सर्व गणेश भक्त आणि आयोजक मंडळे यांच्यासाठी यंदाचे वर्ष अतिशय उत्सुकतेने भारलेले होते. मात्र या सगळ्यात प्रदूषणाचा मात्र उच्चांक झाला, हे देखील तितकेच खरे.
या गणेशोत्सवात गणरायाचे स्वागत आणि 10 दिवसांच्या चैतन्याने भरलेल्या दिवसांची सांगता या दोन्ही घटनांच्या दरम्यान हालते देखावे प्रबोधनात्मक सादरीकरण करण्यात आले. देखावे, विद्युतरोषणाई हे सगळं औत्सुक्याने पाहताना रात्र जागवणारे पुणेकर यंदा किती ध्वनीपातळीला सामोरे जात होत,े याचा शास्त्रीय अभ्यास शहरात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आला.
पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष उत्पादन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ही पाहणी केली आहे. यामध्ये जय टिपरे, नंदन झंवर, सार्थक मोरकर, आर्यमन महाजन, श्री खेडकर, सेजल मेश्राम, प्रत्युषा म्हस्के, रोशनी पाडवे, अपेक्षा शेळके, आयुष जैन, शर्वरी मोराडे, श्रद्घा पाटील, जयवंत नांदोडे या विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
या पाहणीनुसार रोज संध्याकाळी सुमारे 9 ते 10 या वेळेत शहरातील विविध चौकातून या नोंदी केल्या गेल्या. उत्सवात रोज काही तास 80 ते 90 डेसीबल इतका सरासरी आवाज या सगळ्यांच्या कानापर्यंत पोचल्याचे आढळून आले आहे. उत्साहाच्या भरात त्या त्यावेळी त्याची तीव्रता त्यांना जाणवत नसली तरी ती मोलाची आहे. यापैकी बऱ्याच ठिकाणांच्या जवळपास नागरी वस्ती, दवाखाने, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असल्याने हा मुद्दा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
ही आहेत निरीक्षणे…
* उत्सवाच्या सुरुवातीस अतिशय तुरळक अपवाद वगळता अतिशय शिस्तीत नियोजन
* वेळेची सूट दिल्यानंतर भक्तांची गर्दी आणि ध्वनीपातळीत वाढ
* मध्यवस्ती, उपनगरांतही आवाजाची गणेशवंदना केल्याचे दिसले.