पुणे – भविष्यातील इंधन म्हणून पीएमपी प्रशासनाकडून बस चालविण्यासाठी हायड्रो-सीएनजीचा वापर करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पीएमपीने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाशी (एआरएआय) चर्चा सुरू केली आहे. मात्र, त्याचवेळी कचर्यापासून हायड्रोजन तयार करण्याच्या प्रकल्पासाठी महापालिकेला वेळ मिळत नसल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने हा प्रकल्प उभारल्यास ३८ लाख टन मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, केंद्रीय संस्थांनी तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक अहवाल दिली आहे. पण केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात निर्णय होत नसल्याने सव्वा वर्षापासून महापालिकेने याबाबत निर्णय घेण्यास् असमर्थता दर्शविल्याने हा प्रकल्प मागे पडला आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकारकडून भविष्यातील इंधन म्हणून हायड्रोजन निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकल्पास अनुदानही मिळणे शक्य आहे. यासाठी महापालिकेने केंद्र सरकारला निधी मागितला असला तरी त्यावर निर्णय झालेला नाही. तसेच निविदेत महापालिकेकडून आर्थिक मदत केली जावी, असे निविदेत नसल्याने यासंदर्भातही विचार केला जात नाही. या विषयाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीची बैठक होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासन म्हणते…
हायड्रो-सीएनजीवर बस धावू लागल्या तर सीएनजीची बचत होईल. तसेच बसला चांगला अॅव्हरेज मिळेल. मात्र, हायड्रो-सीएनजीबाबत पीएमपी प्रशासनाकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास त्याबाबत सर्व बाबी तपासून, चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.