पुणे – सुमारे ४० वर्षानंतर पवार साहेबांना छत्रपती शिवरायांच्या चरणी जावे लागते. याचे क्रेडिट अजित पवारांना द्यावे लागेल. आता तुतारी कुठे वाजते ? किती वाजते ? कशी वाजते ? हे आपल्याला भविष्यात दिसेलच, अशा शब्दांत तुतारी या चिन्हावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शनिवारी रायगडावर शक्तीप्रदर्शन करत पक्षाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे अनावरण केले. या कार्यक्रमाला स्वत: शरद पवार उपस्थित होते. त्यावरून फडणवीस यांनी भाष्य केले. दरम्यान, महायुतीच्या जागा वाटपाबाबत एक बैठक झाली आहे. ती समाधानकारक झाली असून, आमची आणखी एक बैठक होईल.
त्यानंतर आमचे जागा वाटप लवकर होईल, तसेच, अद्याप कोणाचेही नाव अंतिम झालेले नाही. फक्त चर्चांवर कोणतीही नावे अंतिम होत नाहीत. ही प्रक्रिया असते. त्यानुसार नावे अंतिम झाल्यावर जाहीर केली जातील, असे सांगत नारायण राणे तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उमेदवारी निश्चित नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.