शेवगाव – तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी सकाळी दोन तास रस्ता रोको करून शासनाचा निषेध करण्यात आला. सग्या सोयऱ्यांच्या काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
आज लग्नतिथी असल्याने वऱ्हाडी मंडळीनां घेऊन जाणारीठअनेक वाहने या रास्ता रोकोमध्ये अडकल्याने सकल मराठा समाजाच्या तरुणांनी समजूतदारीची भूमिका घेऊन निषेध व्यक्त करत रास्ता रोको आटोपता घेतला.
यावेळी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, तुकाराम शिंगटे, बाळासाहेब काळे, एकनाथ काळे, मच्छिंद्र आर्ले, राजेश लोंढे, भाऊराव फटांगरे, गणेश शिंदे, हरिचंद्र जाधव, संजय फाटके, राजू झिरपे, दीपक सामृत, कृष्णा जाधव, प्रशांत सामृत, महेंद्र खरड, शहाराम आगळे आदींनी रास्ता रोकोसाठी परिश्रम घेतले.यावेळी चारही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अजय महाराजांची मस्ती उतरवणार
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी अजय महाराज बावस्कर यांनी त्यांना पाणी घेण्याचा आग्रह करून त्यानंतर जरांगे पाटलाविषयीच अपशब्द वापरल्याने मराठा समाज त्यांची मस्ती उतरवणारच, अशा शब्दात मराठा आंदोलक रामजी शिदोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.