पुणे – मुंबई-पुणे- हैदराबाद हायस्पीड रेल कॅरिडॉरचा आता महापालिकेच्या फुरसुंगी आणि लोहगावच्या प्रस्तावित विकास आराखड्यातही समावेश करावा, अशी सूचना भारतीय हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने केली आहे. दरम्यान, या मार्गाचा यापूर्वीच “पीएमआरडीए’च्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय हायस्पीड रेल्वे कॉपोरेशन लिमिटेडने देशभरात आठ बुलेट ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. या ट्रेन्स प्रतितास 252 ते 320 या वेगाने धावतील. “पीएमआरडीए’ विकास आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित नव्हता. त्यामुळे तो समाविष्ट करावा, यासाठी हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने यापूर्वी पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन “पीएमआरडीए’ने प्रस्तावित विकास आरखड्यात हा मार्ग दर्शवला आहे.
दरम्यान, फुरसुंगी आणि लोहगाव ही दोन गावे यापूर्वीच महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. हा रेल्वे मार्ग या हद्दीतूनही जातो. तर, फुरसुंगी येथे महापालिकेने दोन नगर रचना योजना (टीपी स्किम) प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी एका योजनेचे प्रारूप महापालिकेने जाहीर केले आहे.मात्र, दुसऱ्या नगर रचना योजनेचे काम सध्या सुरू आहे. मात्र, नगर रचना योजना आणि प्रस्तावित विकास आराखड्यात हा रेल्वे मार्ग दर्शविण्यात आलेला नाही.