हेन्री किसिंजर यांचा शांतिदौरा फिसकटला
जेरुसलेम, दि. 23 – इस्रायल व इजिप्त यांचे शत्रुत्व संपविता येणार नाही, असे आढळून आल्याने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री डॉ. हेन्री किसिंजर यांनी आपला “पश्चिम आशिया शांतता दौरा’ मध्येच संपविला असून ते आता वॉशिंग्टनला परततील. दुर्देैवाने इजिप्त व इस्रायल यांच्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविणे अशक्य असल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे आम्हाला असे वाटते की, सर्व संबंधितांनी टिकाऊ शांततेच्या दृष्टीने वाटचाल करण्याबाबत विचार करण्यासाठी काही काळ जाणे आवश्यक आहे. याबाबत इस्रायली सरकारने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, इजिप्तनेच युद्धाची स्थिती संपविण्यास नकार दिला व ती चालूच राहण्यावर भर दिला.
धान्याच्या आंतरराज्य वाहतुकीस परवानगी द्या
नवी दिल्ली – सरकारने आंतरराज्य धान्य वाहतुकीस परवानगी द्यावी अशी मागणी के. के. बिर्ला यांनी केली. ते म्हणाले, अशा निर्बंधामुळे सर्वांना योग्य किमतीत धान्याचे वाटप करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. धान्याचे योग्य वाटप करण्याची व्यापाऱ्यांची क्षमता असून सरकारने त्यांच्यावर विश्वास ठेवावा. व्यापाऱ्यांना योग्य तो नफा मिळावयास हवा पण अधिक नफ्यासाठी गैरप्रकार करू नयेत.
कारखान्यांना चार दिवस वीजपुरवठा बंद
पुणे – शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वीज कपातीचे निर्बंध सैल केल्याची घोषणा केली होती. पण त्या काळात वापरलेली वीज भरून काढण्यासाठी 27 ते 30 मार्चअखेर राज्यांतील सर्व कारखान्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल.